पैठण, (प्रतिनिधी): छत्रपती शिवाजी महाराजांची आग्रा कैदेतून सुखरूप सुटका झाली. त्या घटनेस ३६० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आयोजित करण्यात आलेल्या भारतीय स्तरावरील शिवछत्रपती शौर्य समारोह कार्यक्रमात महाराष्ट्रातील दहा दिव्यांगांचा सत्कार सन्मान करण्यात आला.
आग्रा येथे आयोजित करण्यात आलेल्या महाराजा शिवछत्रपती शौर्य समारोह कार्यक्रमात राज्यातील शिवुर्जा प्रतिष्ठानच्या १० शिवप्रेमी, दुर्गप्रेमी व इतिहास प्रेमी दहा दिव्यांगांना देश पातळीवर मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
शिवुर्जा प्रतिष्ठान या दिव्यांगांच्या दुर्ग भ्रमण संवर्धन संस्थेच्या वतीने गेल्या वीस वर्षापासून राज्यातील सर्व प्रकारच्या दिव्यांगांसाठी प्रत्येक महिन्याला गड किल्ले भटकंती मोहिमेचे आयोजन करण्यात येते. प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाजी गाडे यांच्या नेतृत्वाखाली व उपक्रमामध्ये सहभाग घेऊन छत्रपती शिवरायांच्या शेकडो गड किल्ल्यांची भटकंती केली आहे.
सचिव कचरू चांभारे यांच्या मार्गदर्शनाखाली आत्तापर्यंत हजारो दिव्यांगांनी या अनोख्या या उपक्रमाची दखल घेत मुख्य समन्वयक आयोजक जनार्दन देसले पाटील यांनी ह्या दिव्यांगांना सन्मानित करण्यासाठी आग्रा येथे विशेष निमंत्रित केले होते.
या अनोख्या उपक्रमाची दखल घेऊन कार्यक्रमाचे मुख्य समन्वयक जनार्दन देसले पाटील यांनी आयोजित केलेल्या या शानदार शिवछत्रपती शौर्य समारोह सोहळ्यात शिवाजी गाडे पैठण, कचरू चांभारे बीड, सागर बोडके नाशिक, अंजली प्रधान नाशिक, सुनील वानखडे बाळापूर, जगन्नाथ चौरे ठाणे, काजल कांबळे सांगली, जीवन टोपे खेड पुणे, विजय पाटील चाळीसगाव, सतीश आळकुटे आळंदी या राज्यातील १० दिव्यांगांना सन्मानित करण्यात आले.
विश्वभूषण राजे शिवछत्रपती चेतना यात्रा, अखिल भारतीय प्रचार कार्यालय नवी दिल्ली, छत्रपती शिवाजी शोध संस्था कैलहट बनारस यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. बीके सिंह, मुख्य अतिथी माजी मंत्री राजमनी पटेल, डॉ. ए. एस. सचान, मुख्य प्रवक्ता डॉ. सोमनाथ रोडे, स्वागत अध्यक्ष राज बहादुर सिंह व आयोजक जनार्दन देसले पाटील यांच्यासह देशभरातील सतरा राज्यातील इतिहास संशोधक व शिवप्रेमी उपस्थित होते.















